PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 4, 2024   

PostImage

फेरफारसाठी सहा हजारांची लाच, मंडळाधिकारी, तलाठी अटकेत


 

 गडचिरोली जमीन फेरफार करून सातबारावर नावे लावण्यासाठी ९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ६ हजार रुपये स्वीकारणाऱ्या मंडळाधिकारी व तलाठ्यास २ ऑगस्टला जेरबंद केले. ही कारवाई महागाव (ता. अहेरी) येथे केली.

 

खमनचेरू येथील मंडळ अधिकारी भूषण रामभाऊ जवंजाळकर (३८) वर्ग ३ व व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (४०) वर्ग ३ यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. महागाव येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीचा फेरफार करून सातबारावर तीन नावे लावायची होती. त्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार याने प्रत्येकी ३ हजार रुपयांप्रमाणे तीन नावे

 

लावण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचमागणी पडताळणी करून २ ऑगस्टला सापळा लावला. जल्लेवार याने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यास पकडले.

 

 

 

२४ तासांत दुसरी कारवाई

 

१ ऑगस्टला लाच मागणी केल्याप्रकरणी धानोरात बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अक्षय आगळे यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर २ ऑगस्टला अहेरीत मंडळाधिकारी व तलाठ्यास लाच घेताना पकडले. २४ तासांत दोन कारवायांत तिघांना जेरबंद केल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. जवंजाळकर यालाही ताब्यात घेतले. एसीबीचे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो. नि. शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, किशोर जौंजारकर, अंमलदार प्रवीण जुमनाके यांनी कारवाई केली.